बातमीत काय वाचाल?
- या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले असून, निर्मिती विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांनी केली आहे.
- नावाप्रमाणेच “सुपर डूपर” हा सिनेमा कॉमेडी, ड्रामा आणि भावनिक प्रसंगांनी परिपूर्ण आहे.
- विशेष म्हणजे, भायखळा येथील लव्हलेन परिसरात राहणारे विनोद रोकडे यांनी या चित्रपटात छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत हलक्याफुलक्या, कौटुंबिक मनोरंजनाचा ट्रेंड कायम ठेवत “सुपर डूपर” हा बहुचर्चित सिनेमा अखेर ३ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब पाहता येईल असा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरत आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. नावाप्रमाणेच “सुपर डूपर” हा सिनेमा कॉमेडी, ड्रामा आणि भावनिक प्रसंगांनी परिपूर्ण आहे. कथानक एका घराभोवती फिरतं, जिथे एकाच फ्लॅटची विक्री दोन वेगवेगळ्या कुटुंबांना होते. एका बाजूला पारंपरिक गावाकडचं कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांचं शहरातलं जोडपं — या दोन टोकाच्या विचारांच्या लोकांमध्ये होणारी धमाल जुगलबंदी प्रेक्षकांना खळखळून हसवते.
चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते, ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांसारख्या दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळते. “झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच” हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.
विशेष म्हणजे, भायखळा येथील लव्हलेन परिसरात राहणारे विनोद रोकडे यांनी या चित्रपटात छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले असून, निर्मिती विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांनी केली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि ताजातवाना अनुभव देतो.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत हसत-खेळत वेळ घालवायचा असेल, तर “सुपर डूपर” हा सिनेमा नक्की पाहा. हसवणूक, भावना आणि नात्यांची सुंदर गुंफण असलेला हा चित्रपट तुमचा पूर्ण पैसा वसूल करेल!
