Site icon लोकवार्ता

“पल्लवी थोरवे यांची आंतरराष्ट्रीय भरारी; अमेरिकेत दोनदा गाजवली महाराष्ट्राची लावणी, लहान वयातच ‘लावणीसम्राज्ञी’चा किताब”

Person of the Year Featured Pallavi Thorave

बातमीत काय वाचाल?

  • मराठी कला विश्वात आपल्या दमदार उपस्थितीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पल्लवी थोरवे यांनी अभिनय, नृत्य आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
  • विशेष म्हणजे, पल्लवी थोरवे यांनी लावणी नृत्याच्या माध्यमातून दोन वेळा अमेरिकेचा दौरा करून तिथं लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, ही त्यांची मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी मानली जाते.
  • मुंबईतील रहिवासी असलेल्या पल्लवी थोरवे या एक कुशल लावणी नृत्यांगना, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.
मुंबईची सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री, पल्लवी थोरवे—पारंपारिक वेशभूषेत आपली अदा आणि शैलीचे प्रदर्शन करताना.

मुंबई | प्रतिनिधी

मराठी कला विश्वात आपल्या दमदार उपस्थितीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पल्लवी थोरवे यांनी अभिनय, नृत्य आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः लावणी नृत्याच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे.

मुंबईतील रहिवासी असलेल्या पल्लवी थोरवे या एक कुशल लावणी नृत्यांगना, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कलागुणांची दखल घेत त्यांना २०२४ व २०२५ या कालावधीत अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये ‘नवदुर्गा अवॉर्ड’, ‘समाजिक रत्न अवॉर्ड’, ‘कलाभूषण अवॉर्ड’ तसेच ‘राज्यस्तरीय कला विकास रत्न प्रेरणा अवॉर्ड’ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हिरवगावकर पोवळा पुरस्कार हा लावणी नृत्यातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळण्याने अगदी लहान वयातच पल्लवी थोरवे ह्या लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

पल्लवी थोरवे यांनी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला असून त्या अनेक स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

चित्रपट आणि लघुपट क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. ‘फंटर’, ‘फंटर्स अगेन’, ‘अर्धनारीश्वर’, ‘शिवगड’, ‘जिजा’ आणि ‘चहा’ या लघुपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘क्राईम वॉच’ (साम मराठी) या कार्यक्रमातूनही त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.

डिजिटल माध्यमांमध्येही त्या सक्रिय असून विविध गाण्यांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर त्यांच्या कामाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे.

विशेष म्हणजे, पल्लवी थोरवे यांनी लावणी नृत्याच्या माध्यमातून दोन वेळा अमेरिकेचा दौरा करून तिथं लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, ही त्यांची मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी मानली जाते. हा दौरा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

‘लावणी क्वीन’, ‘महाराष्ट्राची लावणी धारा’, ‘रंग लावण्या सखी’, ‘नवरंगी नार’ यांसारख्या विविध लावणी बॅनर्समधून त्यांनी आपली कला सादर केली आहे. त्यांच्या नृत्यातील ऊर्जा, अभिव्यक्ती आणि पारंपरिकतेची जोड यामुळे त्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात.

कलाक्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असलेल्या पल्लवी थोरवे या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या आगामी प्रकल्पांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version