बातमीत काय वाचाल?
- प्रविण शिवराम पवार यांनी आता बहुजन समाज पार्टीच्या (BSP) मुंबई शहर अध्यक्ष पदासाठी आपली ठाम इच्छुकता व्यक्त केली आहे.
- माजी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि माजी मुंबई शहर सचिव मा.
- “रुग्ण हक्क अभियान” या त्यांच्या NGO मार्फत ते रुग्णांना योग्य उपचार मिळावेत आणि खासगी रुग्णालयांकडून होणारी पिळवणूक थांबवावी यासाठी सातत्याने काम करत आहेत.
मुंबई : बहुजन समाजाच्या राजकारणात नवे समीकरण घडवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. माजी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि माजी मुंबई शहर सचिव मा. श्री. प्रविण शिवराम पवार यांनी आता बहुजन समाज पार्टीच्या (BSP) मुंबई शहर अध्यक्ष पदासाठी आपली ठाम इच्छुकता व्यक्त केली आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक आणि संघटनात्मक कार्याच्या बळावर ही दावेदारी केवळ औपचारिक नसून एक ठोस आणि दूरदृष्टी असलेली पुढाकार म्हणून पाहिली जात आहे.
प्रविण पवार यांनी आतापर्यंत बसपा संघटनेसाठी केलेले योगदान मोठे आणि बहुआयामी आहे. मुंबईत बसपा वाढावी, संघटन अधिक मजबूत व्हावे आणि कार्यकर्त्यांना सक्षम बनवावे, यासाठी त्यांनी एक सुस्पष्ट “ब्लूप्रिंट” तयार केल्याचे त्यांनी सांगितले. या आराखड्यात कार्यकर्ता मेळावे, नियमित प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच कार्यकर्त्यांना उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन देण्यावर भर आहे. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी ते स्वतःहून निधी उभारणीचे विविध मार्ग शोधत असून आर्थिक साक्षरतेसाठी उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे.
राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही पवार यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. “रुग्ण हक्क अभियान” या त्यांच्या NGO मार्फत ते रुग्णांना योग्य उपचार मिळावेत आणि खासगी रुग्णालयांकडून होणारी पिळवणूक थांबवावी यासाठी सातत्याने काम करत आहेत. अनेक वेळा रात्री-अपरात्री मदतीसाठी धाव घेऊन रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देणे, हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत पाठपुरावा करणे—ही त्यांची कार्यशैलीच बनली आहे.
याशिवाय, अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या ३०० हून अधिक नागरिकांना त्यांनी मुक्त करून त्यांना नवजीवन दिले आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, त्यांच्या अडचणी सोडवणे यामुळे युवा वर्गात त्यांची विशेष लोकप्रियता निर्माण झाली आहे. महिला सन्मान उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, महापुरुषांच्या जयंती कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, चर्चासत्रे आणि साहित्य संमेलन अशा विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमुळे त्यांनी व्यापक समाजाशी दृढ नाते निर्माण केले आहे.
दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अल्पावधीतच प्रभावी संघटन उभारणी आणि लोकोपयोगी उपक्रम राबवून आपली क्षमता सिद्ध केली होती. त्याच अनुभवाच्या जोरावर ते आता मुंबई शहर अध्यक्षपदासाठी सज्ज झाले आहेत.
“मुंबई अध्यक्षपद मिळताच मी संघटन वाढीसाठी पूर्णपणे कटिबद्ध असेन. बसपाच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिका नगरसेवक, आमदार ते खासदार अशा विविध स्तरांवर संधी मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे पवार यांनी लोकवार्ता प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
मुंबईच्या राजकारणात बसपाला नवसंजीवनी देण्याची क्षमता प्रविण पवार यांच्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवी दिशा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
