लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड

जिद्द, कष्ट आणि समाजसेवेचा सुंदर संगम – लीना कांबळे यांची प्रेरणादायी यशोगाथा

Featured Image 2 Leena Kamble

बातमीत काय वाचाल?

  • समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” यंदा व्यवसाय आणि समाजकार्य या दोन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या लीना कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
  • नवी मुंबईतील उलवे परिसरात राहणाऱ्या लीना कांबळे या एक यशस्वी आणि जिद्दी व्यवसायिका म्हणून ओळखल्या जातात.
  • त्यांनी स्वबळावर, स्वकष्टाने आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत “The'S” या नावाने स्वतःचा सलून आणि ब्युटी अकॅडमी सुरू केली.

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” यंदा व्यवसाय आणि समाजकार्य या दोन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या लीना कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सृष्टी फाउंडेशन, रुग्ण हक्क अभियान आणि लोकवार्ता न्यूज पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान केला जाणार आहे.

नवी मुंबईतील उलवे परिसरात राहणाऱ्या लीना कांबळे या एक यशस्वी आणि जिद्दी व्यवसायिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी स्वबळावर, स्वकष्टाने आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत “The’S” या नावाने स्वतःचा सलून आणि ब्युटी अकॅडमी सुरू केली. मागील तीन वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय यशस्वीपणे सुरू असून आज तो परिसरात विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड म्हणून ओळखला जात आहे.

व्यवसायाची सुरुवात करताना लीना कांबळे यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक मर्यादा आणि व्यवसायातील स्पर्धा यावर मात करत त्यांनी धैर्य, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या सलूनमध्ये आधुनिक ब्युटी सेवा उपलब्ध असून त्यांच्या ब्युटी अकॅडमीच्या माध्यमातून अनेक मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे.

लीना कांबळे यांचे कार्य केवळ व्यवसायापुरते मर्यादित नसून त्या सामाजिक कार्यातही तितक्याच सक्रिय आहेत. “आपण समाजाचं काही तरी देणं लागतो” या भावनेतून त्या समाजातील गरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदतीचा हात देतात. विशेषतः आजारी रुग्ण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे तसेच शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कोणताही जातीभेद न करता शक्य तेवढी मदत करण्याचा त्या नेहमी प्रयत्न करतात.

याशिवाय पर्यावरण संवर्धनाबाबतही त्यांची जाणीव अत्यंत प्रखर आहे. पारंपरिक सण-उत्सव किंवा राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने त्या नियमितपणे वृक्षारोपण करून पर्यावरणाशी समतोल राखण्याचा संदेश समाजाला देतात.

जिद्द, मेहनत, समाजसेवेची भावना आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारी या सर्व गुणांचा संगम म्हणजे लीना कांबळे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात येणार आहे.

त्यांची ही यशोगाथा केवळ एका यशस्वी व्यवसायिकेची कथा नसून जिद्दीने स्वप्न पूर्ण करणाऱ्या आणि समाजाला परतफेड करण्याची भावना जपणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.