बातमीत काय वाचाल?
- तो त्या मानसिकतेचा आहे जी विचार न करता विश्वास ठेवते, आणि त्या सत्तासंरचनेचा आहे जी या विश्वासाचा वापर करून स्वतःचे साम्राज्य उभारते.
- याच ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो—धर्म शिकवणारे हे लोक खरोखरच अध्यात्म देत आहेत का, की ते केवळ लोकांच्या भीती, आशा आणि समस्यांचा व्यापार करत आहेत.
- धर्म, अध्यात्म आणि श्रद्धा या पवित्र संकल्पनांच्या आड उभी राहिलेली एक संपूर्ण यंत्रणा आज प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे.
हिंदू धर्म अंधश्रद्धा आणि ‘आध्यात्मिक मॉल’च्या विळख्यात!

अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा समाजाला अस्वस्थ केले आहे. धर्म, अध्यात्म आणि श्रद्धा या पवित्र संकल्पनांच्या आड उभी राहिलेली एक संपूर्ण यंत्रणा आज प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. हा प्रश्न एका व्यक्तीचा नाही; तो त्या मानसिकतेचा आहे जी विचार न करता विश्वास ठेवते, आणि त्या सत्तासंरचनेचा आहे जी या विश्वासाचा वापर करून स्वतःचे साम्राज्य उभारते.
अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांनी या देशात मोठी किंमत मोजली आहे. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांनी समाजाला विचार करायला शिकवले, प्रश्न विचारण्याची ताकद दिली; पण त्यासाठी त्यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटना केवळ हत्या नाहीत, तर विवेकबुद्धीवर झालेले हल्ले आहेत. तरीही, आजही समाजाचा एक मोठा वर्ग अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेला दिसतो, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.
या अंधश्रद्धेला खतपाणी मिळते ते प्रभावशाली लोकांच्या वर्तनातून. जेव्हा मोठे उद्योगपती, राजकारणी आणि सेलिब्रिटी अशा तथाकथित बाबांच्या दरबारात हजेरी लावतात, तेव्हा ते केवळ वैयक्तिक श्रद्धा व्यक्त करत नाहीत, तर एक सामाजिक संदेश देतात. आसाराम बापू यांच्या बाबतीत हे स्पष्ट झाले होते. एकेकाळी त्यांच्या कार्यक्रमांना मोठमोठे नेते उपस्थित राहत, ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांचेही नाव त्या काळातील संदर्भात चर्चेत आले होते; मात्र नंतर त्यांच्यावर गंभीर गुन्हे सिद्ध झाले. यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते — प्रभाव म्हणजे सत्य नाही.
अशोक खरात संदर्भात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो चर्चेत आल्याचे सांगितले जाते. तसेच रुपाली चाकणकर यांच्याबाबत काही माध्यमांमध्ये तक्रारींशी संबंधित FIR प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचे आरोप झाल्याचे दावे समोर आले आहेत. या सर्व बाबींची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे; कारण जर तक्रारदारांवरच दबाव येत असेल, तर तो केवळ एका प्रकरणाचा मुद्दा राहत नाही—तो संपूर्ण न्यायप्रक्रियेवरील विश्वासाला धक्का देणारा ठरतो.
जयेन्द्र सरस्वती यांचे कांची प्रकरण या चर्चेला वेगळा आयाम देते. वाद (हेतू) असला तरी न्यायालयात ठोस पुरावे सादर न झाल्याने निर्दोष मुक्तता झाली. यामुळे एक मूलभूत तत्त्व अधोरेखित होते— हेतू आणि पुरावे वेगळे असतात. पण अशा घटनांमुळे समाजात संशय निर्माण होतो की जर पुरावे साखळीबद्ध पद्धतीने मांडले गेले नाहीत, तर आरोपी सुटू शकतो. हा संशयच लोकांच्या मनातील अस्वस्थतेचे कारण बनतो.
या सर्व चित्रामध्ये आता एक नवीन आणि अधिक धोकादायक पैलू स्पष्टपणे दिसू लागला आहे—आध्यात्माचे व्यापारीकरण. आजकाल सत्संग आणि अध्यात्म हे जणू काही “शॉपिंग मॉल”सारखे झाले आहेत. तथाकथित आश्रमांमध्ये अध्यात्माबरोबरच विविध वस्तू, सेवा, पूजा-विधी, पुस्तके, ताईत, प्रसाद आणि इतर अनेक गोष्टी विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. केवळ ठेवलेल्या नाहीत, तर त्या अतिशय जास्त दराने विकल्या जातात. भक्तांना सांगितले जाते की या वस्तूंमध्ये ‘आध्यात्मिक शक्ती’ आहे, त्यातून त्यांच्या समस्या दूर होतील, आयुष्य बदलून जाईल. आणि हीच गोष्ट सामान्य, भावनिक आणि श्रद्धाळू लोकांना आकर्षित करते.
परिणाम असा होतो की बिचारी सामान्य जनता आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून या गोष्टी विकत घेते आणि नकळतपणे त्या भोंदू व्यवस्थेची गाभा भरत राहते. श्रद्धा ही वैयक्तिक आणि पवित्र असते; पण जेव्हा तिचा व्यवसाय केला जातो, तेव्हा ती श्रद्धा राहात नाही—ती बाजारपेठ बनते. आज अनेक ठिकाणी “श्रद्धेचा बाजार” मांडला गेला आहे, जिथे अध्यात्माच्या नावाखाली भावनांची विक्री होत आहे.
याच ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो—धर्म शिकवणारे हे लोक खरोखरच अध्यात्म देत आहेत का, की ते केवळ लोकांच्या भीती, आशा आणि समस्यांचा व्यापार करत आहेत? स्वतः कोट्यवधींची संपत्ती जमवणारे आणि आलिशान जीवन जगणारे हेच लोक भक्तांना मोह-माया सोडण्याचा सल्ला देतात, हा विरोधाभास समाजाने ओळखण्याची गरज आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेली दुर्घटना देखील या व्यवस्थेतील वास्तव दाखवते. ‘आध्यात्मिक शक्ती’चा दावा करणारे गुरू अशा वेळी आपल्या भक्तांचे रक्षण करू शकत नाहीत, ही वस्तुस्थितीच त्यांच्या दाव्यांवर प्रश्न निर्माण करते. कारण या संपूर्ण व्यवस्थेचा पाया अध्यात्मावर नसून श्रद्धेच्या आड लपलेल्या प्रभाव आणि नियंत्रणावर आधारित आहे.
या सर्व घटनांचा एकत्रित विचार केला तर “हिंदू खतरें में आहे” हा नारा वेगळ्याच अर्थाने समोर येतो. धर्माला बाहेरून धोका नसतो; तो आतूनच निर्माण होतो—अंधश्रद्धेमुळे, व्यक्तीपूजेमुळे, आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या बाजारपेठेमुळे. श्रद्धा जर विवेकबुद्धीशी जोडलेली असेल तर ती समाजाला उन्नत करते; पण जेव्हा ती अंधश्रद्धेत रूपांतरित होते, तेव्हा तीच समाजाला कमकुवत बनवते.
या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग समाजानेच शोधला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे—“मी जे मानतोय ते खरे आहे का?” “या गोष्टीमागे विज्ञान, तर्क किंवा सत्य आहे का?” कोणत्याही व्यक्तीला अंधपणे मानण्याऐवजी तत्त्वांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, अंधश्रद्धेविरोधी कायद्यांची अंमलबजावणी, आणि प्रभावशाली लोकांनी जबाबदारीने वागणे हीदेखील तितकीच महत्त्वाची पावले आहेत.
शेवटी, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांनी दिलेला संदेश आज अधिक महत्त्वाचा आहे—श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा टाळा. धर्म वाचवायचा असेल, तर त्याच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या या भोंदूपणाच्या बाजाराला थांबवणे हीच खरी गरज आहे. “हिंदू खतरें में है” हा नारा देण्यापेक्षा, श्रद्धेला बाजार बनवणाऱ्या या व्यवस्थेविरुद्ध उभे राहणे हीच खरी जागृती आहे.
