Site icon लोकवार्ता

सामाजिक कार्यातून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या स्व. शरयू सूर्यकांत सावंत यांना मरणोत्तर “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६”

बातमीत काय वाचाल?

  • शरयू सूर्यकांत सावंत यांनी आपल्या सासूबाईंच्या स्मरणार्थ “मातोश्री मंदाकिनी (शांती) चॅरिटेबल ट्रस्ट” ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचा आवाका अधिक व्यापक केला.
  • मंदाकिनी बाबाजी सावंत यांच्या निधनानंतरही त्या खचून न जाता दरवर्षी पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत त्यांची आठवण जपण्याचा प्रयत्न करत राहिल्या.
  • राष्ट्रपुरुषांच्या जयंती सोहळ्यांमध्ये त्या नेहमी हिरीरीने सहभागी होत आणि त्या निमित्ताने विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

समाजसेवेची जाणीव मनात असली की कोणत्याही परिस्थितीतून समाजासाठी काम करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे स्वर्गीय शरयू सूर्यकांत सावंत. आर्टस् शाखेत पदवीधर असलेल्या शरयू सावंत या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. सामाजिक कार्याची मजबूत पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्यामध्ये समाजसेवेची भावना रुजली.

लग्नानंतर पती श्री. सूर्यकांत मंदाकिनी बाबाजी सावंत यांची मिळालेली साथ आणि प्रोत्साहन यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळाले. समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची त्यांची जिद्द आणि तळमळ यामुळे त्या विभागात सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाऊ लागल्या.

राष्ट्रपुरुषांच्या जयंती सोहळ्यांमध्ये त्या नेहमी हिरीरीने सहभागी होत आणि त्या निमित्ताने विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या सासूबाई स्व. मंदाकिनी बाबाजी सावंत यांच्या निधनानंतरही त्या खचून न जाता दरवर्षी पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत त्यांची आठवण जपण्याचा प्रयत्न करत राहिल्या.

गोरगरिबांना अन्नदान, कपड्यांचे वाटप, औषधांचे वितरण तसेच आरोग्य सेवांमध्ये मदत अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांत त्या सातत्याने सहभागी होत असत. सर्व धर्मियांच्या विविध सण-समारंभांमध्ये सहभागी होऊन समाजात बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देण्याचे कामही त्यांनी केले.

आंबेडकर जयंती समिती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देणे, शाळेची फी भरणे, शालेय गणवेश, शूज आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे यासारखे अनेक उपक्रम राबवले. गरीब विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कामही त्यांनी केले.

विभागातील ख्रिस्ती बांधवांच्या सणांमध्ये सांताक्लॉजचे रूप धारण करून गरजू मुलांना केक, मिठाई आणि चॉकलेट्स वाटप करून त्यांच्या आनंदात भर घालण्याचा उपक्रम त्यांनी राबवला. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तसेच विविध शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करून महिलांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले.

विशेष म्हणजे स्वतः कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत असतानाही त्यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता गरजू नागरिकांना शिधावाटप करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. गणेशोत्सव तसेच इतर राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एकत्र करून जनजागृतीचे कार्यही त्यांनी सातत्याने केले.

आपल्या हयातीतच स्व. शरयू सूर्यकांत सावंत यांनी आपल्या सासूबाईंच्या स्मरणार्थ “मातोश्री मंदाकिनी (शांती) चॅरिटेबल ट्रस्ट” ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचा आवाका अधिक व्यापक केला. आपल्या सासूबाईंना त्यांनी एका वेगळ्याच स्तरावर जाऊन आदरांजली वाहिली होती. मात्र कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे सामाजिक कार्याचा हा यज्ञ अखेर थांबला.

तथापि, त्यांचे पती श्री. सूर्यकांत मंदाकिनी बाबाजी सावंत हे आपल्या पत्नीचे अधुरे राहिलेले कार्य त्याच जिद्दीने आणि समर्पणाने पुढे नेताना दिसत आहेत. आजही या ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना सढळ हस्ते मदत केली जात असून हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत सृष्टी फाउंडेशन, रुग्ण हक्क अभियान आणि लोकवार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” साठी स्व. शरयू सूर्यकांत सावंत यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने त्यांना मरणोत्तर “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात येणार असून हा पुरस्कार त्यांच्या पती श्री. सूर्यकांत मंदाकिनी बाबाजी सावंत स्वीकारणार आहेत.

समाजसेवेचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या स्व. शरयू सावंत यांचे कार्य आजही अनेकांना प्रेरणा देत आहे आणि त्यांच्या सेवाभावी कार्याची परंपरा समाजात कायम स्मरणात राहील.

Exit mobile version